प्रवाशांच्या अंगाची लाही लाही

। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

पनवेल रेल्वे स्थानकातील पंखे बंद असल्याने स्थानकात येणार्‍या प्रवाशांना सध्या प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मोठे जंक्शन, रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या या स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी या स्थानकात असते. पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच, सहा, सातवर असलेले मोठमोठे पंखे फक्त नावापुरतेच आहेत. पंख्यांच्या खाली उभे राहिल्यानंतरही हवा लागत नसल्याने प्रवासी वर्गातून सुसज्ज बैठक व्यवस्था तसेच पंख्यांची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे.

मे महिना म्हटला की, प्रचंड उकाडा जाणू लागला आहे. त्यात मे महिन्याची सुट्टी म्हटली, लोकांची गावी तसेच सुट्टीला बाहेर फिरायला जाण्याची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. सध्या मार्गांवरील मेल एक्सप्रेस गाड्या तासंन्तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर गाड्यांची वाट पहावी लागत आहे. मात्र या दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. याशिवाय या ठिकाणी असलेले शौचालयांची साफसफाई नसल्यानेही प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

Exit mobile version