फॉरेन्सिक लॅबचा अहवाल
लखनौ | वृत्तसंस्था |
लखीमपूर हिंसाचार प्रकरणाची फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात गोळीबाराची नुकतीच पुष्टी झालीय. याप्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्याचा जवळचा सहकारी अंकित दास या दोघांनी बंदुकीतून गोळीबार केल्याचं उघड झालंय. तिकुनियातील हिंसाचारावेळी परवानाधारक शस्त्रांनी गोळीबारही झाला होता, हे आता अहवालात स्पष्ट झालंय.
दरम्यान, तिकुनिया हिंसाचारावेळी भाजप नेत्यांनी केलेल्या गोळीबाराचा मुद्दा शेतकर्यांनी उपस्थित केला होता. या तपासासाठी लखीमपूर पोलिसांनी अंकित दासची रिपीटर बंदूक, पिस्तूल आणि आशिष मिश्राची रायफल, रिव्हॉल्व्हर जप्त करुन चारही शस्त्रांचा एफएसएल अहवाल मागवला होता. या गोळीबाराची पुष्टी अहवालात करण्यात आलीय.
आशिष मिश्राच्या परवानाधारक शस्त्रातून गोळीबार करण्यात आल्याचं एफएसएल अहवालात स्पष्ट झालंय. मात्र, हा गोळीबार रायफल की रिव्हॉल्व्हरमधून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर, आशिष मिश्रा आणि अंकित दास यांच्या अडचणी वाढू शकतात. सध्या दोघेही तुरुंगात आहेत.