| पनवेल | वार्ताहर |
महाड येथून कामोठे येथे नातेवाईकाकडे आलेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटणार्या चौकडीला कळंबोली पोलिसानी अटक केली. विशेष म्हणजे लूटमारीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळंबोली पोलिसांनी खारघरमधील कोपरा गावापर्यंत या लुटारूंचा पाठलाग केला होता. मात्र, ते दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर दुसर्या दिवशी रात्री हे लुटारू लूटमारी करण्यासाठी पुन्हा कळंबोली सर्कलजवळ निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या चौघांची धरपकड केली. या चौघांना न्यायालयाने 17 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणातील तक्रारदार स्वप्नील सकपाळ (33) हा महाड येथे राहण्यास असून, तो कामोठे येथील नातेवाईकाकडे आला होता. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तो रोडपाली सिग्नल येथून कळंबोली सर्कलच्या दिशेने पायी चालत जात होता. यावेळी स्वप्नील बिमा कॉम्प्लेक्सजवळ आला असताना केटीएम व पल्सर या दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चौघा लुटारूंनी स्वप्नीलला अडवून त्याला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर चौघा लुटारूंनी त्याच्या खिशात असलेली रोख रक्कम जबरदस्तीने लुटून पलायन केले होते. त्यावेळी स्वप्नीलने पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधून याबाबतची माहिती दिल्यानंतर कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.
त्यानंतर पोलिसांनी या लुटारूंचा खारघरमधील कोपरा गावापर्यंत पाठलाग केला, मात्र हे लुटारू तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर स्वप्नील सकपाळ घाबरल्याने तसेच त्याच्याकडून लुटलेली रक्कम ही किरकोळ स्वरूपाची असल्याने त्याने तक्रार दिली नव्हती. मात्र, चौघे लुटारू पुन्हा कळंबोली सर्कल येथे त्याच मोटारसायकलवरून आले असता स्वप्नीलने त्यांना ओळखून त्यांची माहिती कळंबोली पोलिसांना दिली. त्यानंतर काही वेळातच कळंबोली पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेऊन अशरफ अस्लम खान (22), करण चव्हाण (22), सुजर बिंद (22) व नवनाथ वाघमारे (25) या चारही लुटारूंची धरपकड केली. या चारही लुटारूंविरोधात जबरी लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.