| मुंबई | प्रतिनिधी |
अंधेरी (पश्चिम) येथील रहिवासी रितू आहुजा (67) यांच्या अंगावर सोमवारी (दि.14) सायंकाळी रस्ता रोधक (बॅरिकेट) कोसळून झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तेथे उभारलेले रस्ता रोधक सत्संगासाठी जात असलेल्या महिलेच्या अंगावर पडले आणि त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेनंतरही पोलिसांनी अद्याप कोणाही विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची माहिती घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितू आहुजा या अंधेरी पश्चिम येथील शास्त्रीनगरमध्ये वास्तव्यास असून, त्या सोमवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास लिंक रोड येथे जात होत्या. त्याच वेळी त्यांच्या अंगावर लोखंडी रस्ता रोधक कोसळले. या अपघातात त्यांच्या उजव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. शास्त्रीनगरमधील रहिवासी डॉ. आरती ओरिया या त्यावेळी तेथेच होत्या. रितू यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्या त्यांच्या मदतीसाठी धावल्या. रितू यांच्या अंगावर दोन रस्ता रोधक पडले होते. त्यावेळी कंत्राटदाराचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. परंतु, त्यांनी रितू यांना मदत केली नाही. अखेर डॉ. आरती यांनी तेथे उपस्थित महिलांच्या मदतीने रितू यांना रिक्षात बसवले. त्यानंतर त्यांना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नेण्यात आले. तसेच त्यांनी रितू यांच्या मुलाशी संपर्क साधला आणि त्याला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रितू यांचा मुलगा तात्काळ घटनास्थळी पोहोचला. तसेच त्याने रितू यांना सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी स्थानिक अंबोली पोलिसांनी अद्याप कोणाविरोधातही गुन्हा दाखल केलेला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जखमी महिलेच्या मुलाशी संपर्क साधला आणि त्याच्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्यात आली. रितू यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी अंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.