जलजीवनचे लाखो रुपये पाण्यात

तळा तालुक्यातील निगुडशेत गाव कोरडेच

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील निगुडशेत गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मोदी सरकारने जलजीवन मिशन योजना हाती घेण्यात आली. मात्र, या मिशनचे 32 लाख पाण्यात गेले असून, निगुडशेत गाव कोरडेच राहिले आहे.

या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वीस वर्षे जुन्या पथदर्शी योजनेवरच अवलंबून राहावे लागत असून, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निगुडशेत गाव हे तळा तालुक्यातील डोंगर भागात वसलेले आहे. 1 हजार 54 इतकी लोकसंख्या असलेल्या गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 2005 साली पथदर्शी योजनेतून विहीर बांधण्यात आली होती. मात्र, वाढती लोकसंख्या पाहून 2022 मध्ये जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली. या योजनेसाठी 32 लाख 58 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला. मात्र, अधिकार्‍यांसह कंत्राटदारांनी केलेल्या थातूरमातूर कामामुळे येथील ग्रामस्थांना पाण्याचा टिपूससुद्धा मिळालेला नाही. ज्यांना पाण्याची पाइपलाइन टाकण्याचा व टाकी बांधण्याचा कुठलाही अनुभव नाही, अशा लोकांना कंत्राट दिल्यामुळे निगुडशेतच्या ग्रामस्थांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा करणार्‍या अधिकार्‍यांसह कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version