अपघाताच्या बहाण्याने घातला लाखाचा गंडा

। पनवेल । वार्ताहर ।
अपघाताचा बहाण करत एका अज्ञात टोळीने व्यावसायिकाला लाखाचा गंडा घालण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याददार गुरुचरणलाल मारवा मित्राकडून पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन आपल्या कारने कळंबोलीला जात होते. दरम्यान, मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवत त्यांच्या कारमुळे अपघात घडला असून जखमी मागे असल्याची बतावणी केली. आपल्यामुळे खरोखर दुखापत झाली असल्याची शहानिशा करण्यासाठी मारवा कारमधून उतरून काही अंतर मागे गेले. यावेळी काही अंतरावर त्यांना एका मोटारसायकल चालकासोबत एक महिला स्वत:चा पाय पकडून बसल्याचे निदर्शनास आले. त्या दोघांनी मारवा यांना बोलण्यात गुंतवून ठेवले.
या दरम्यान, मारवा यांच्या गाडीजवळ असणार्‍या दोघांनी कारची काच फोडून कारच्या डॅश बोर्ड मध्ये ठेवलेली 5 लाखांची रक्कम लुटून पलायन केले. घटित प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version