| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा येथील आसावरी सोसायटीमध्ये राहणार्या सातवर्षीय बालकाचे भटक्या श्वानाने लचके तोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासनाने त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. तळोजा फेज दोनमधील सिडकोच्या आसावरी, मारवा, केदार आदी सोसायटी परिसरात भटक्या श्वानांचा वावर वाढल्याचे रहिवासी सांगत आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी आसावरी सोसायटीच्या बाहेर अहान अतिक खान हा सातवर्षीय मुलगा खेळत होता. त्याचवेळी मोकाट कुत्र्याने त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर चावा घेतल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पालकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, सात टाके पडले आहेत. डॉक्टरांनी त्याला प्रतिबंधात्मक लस देऊन व उपचार करून घरी सोडल्याचे जखमी अहानचे वडील अतिक खान यांनी सांगितले. लहान मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती मिळताच काही वेळाने श्वानपथक दाखल झाले होते.