खड्डे चुकविण्यासाठी होणार्या प्रयत्नामुळे अपघाताचा धोका
। उरण । प्रतिनिधी ।
बोकडविरा उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. हे खड्डे चुकविण्यासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांकडून होणार्या प्रयत्नामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे प्रवासी वाहन चालक आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केले जात आहे.
उरण शहर ते जेएनपीटी कामगार वसाहत हा 6 किलोमीटर लांबीचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र, यातील बोकडविरा पोलीस चौकी ते जेएनपीटी कामगार वसाहत हा मार्ग सिडकोला हस्तांतरित करण्यात आला आहे. तर उरण शहर ते बोकडविरा चौकी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. यातील या मार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे खड्डे आहेत. त्यामुळे हद्दीच्या वादामुळे हा नादुरुस्त मार्ग दुरुस्ती केली जात नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा पोलीस चौकी ते जेएनपीटी कामगार वसाहत दरम्यानच्या मार्गाच्या दुरवस्थेबाबत वारंवार चर्चा होत होती. याची दखल घेत सिडकोने या मार्गातील खड्डे बुजवून मार्गाची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या हजारो नागरिकांना खड्डे आणि धुळीपासून दिलासा मिळाला आहे. उरण पनवेल हा प्रचंड रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे झाले होते. या खड्ड्यात पावसानंतर धूळ निर्माण झाल्याने धुळीचा सामना करीत प्रवास करावा लागत होता. यामुळे नागरिकांनी सिडको विरोधात संताप व्यक्त केला होता. नागरिकांची ही समस्या वारंवार मांडल्याने अखेरीस सिडकोच्या वतीने या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या मार्गावर खड्डे भरून डांबरीकरण करण्यात आल्याने नागरिकांना दिसला मिळाला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणार्या उरण शहर ते बोकडविरा चौकी मार्गावरील बोकडविरा उड्डाणपुलाखालील खड्डे बुजविण्याचा मुहूर्त प्रशानसानाला कधी मिळणार, याची आता नागरिकांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करून दुरुस्तीचे काम करण्यात येईल असे उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी सांगितले.
हद्दीच्या वादामुळे दुरूस्ती रखडली
उरण शहर ते जेएनपीटी कामगार वसाहत हा 6 किलोमीटर लांबीचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र यातील बोकडवीरा पोलीस चौकी ते जेएनपीटी कामगार वसाहत हा मार्ग सिडकोला हस्तांतरित करण्यात आला तर उरण शहर ते बोकडविरा चौकी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. हद्दीच्या वादामुळे त्याची दुरुस्ती होत नसल्याची चर्चा आहे.