। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यात यावर्षी दमट हवामान व दाट धुक्यामुळे आंबा व काजूच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
आंबा व काजू उत्पादन चांगले येण्यासाठी यावर्षी सुरुवातीपासूनच पोषक हवामान मिळाले नाही. जानेवारी महिन्यापासून दाट धुक्यामुळे काजू मोहोर बहरला नाही. थंडीचे प्रमाणही अधिक होते. सतत पडणार्या दाट धुक्यामुळे काजू मोहोर होरपळून गेला. याचा परिणाम काजू उत्पादनावर झाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार्या हंगामाने अजूनही गती घेतलेली नाही. त्याचबरोबर या खराब हवामानाचा फटका आंबा बागायतदारांना देखील बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काही बागायतदारांच्या बागांमध्ये आंब्याचे फळ बर्यापैकी मोठे झाले आहे. काही ठिकाणी फळ अद्यापही छोटे आहे, तर काही बागांमध्ये अद्यापही झाडांना मोहोर लागलेला आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहर करपण्याची भीती असून छोटी असलेली कैरी ही गळून पडण्याची भीती असल्याने आंबा बागायतदार देखील चिंतेत आहेत.