। उरण । वार्ताहर ।
खोपटे गावातील पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असतानाही, नागरिकांना तीन-तीन दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे खोपटे ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.8) थेट बांधपाडा ग्रामपंचायतीवर बेंडबाजासह मोर्चा काढला होता.
खोपटे गावात संदिग्ध पाणीपुरवठा लाईन, चुकीच्या पद्धतीने योजनेची हाताळणी आणि अवैध नळजोडणांवर कारवाईचा अभाव यामुळे गावात पाण्यासाठी नागरिकांची बाबाबोंब सुरू आहे. विशेषतः महिलांना सार्वजनिक तलाव व तळ्यांवर कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. खोपटे गावात सात पाड्यांचा समावेश असून, एकाच साठवण टाकीवर संपूर्ण पाणीपुरवठा अवलंबून आहे. ही टाकी धसखोशी पाड्याजवळ आहे. टाकी व गाव यामधील लांब अंतरामुळे पाईपलाईन भरायलाच पंधरा मिनिटे जातात. त्यानंतर केवळ पंधरा मिनिटेच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना घरांमध्ये पाणी खेचण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करावा लागतो. परिणामी विजेच्या बिलाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, बेंडबाजासह ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता.