। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या सेवेत नेहमीच ढिसाळपणा जाणवत आहे. अशा सेवेमुळे ग्राहकांना बँकिंग व्यवहारादरम्यान वाईट अनुभव येत आहेत. सुविधांचे नेहमीच तिनतेरा वाजल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सर्वसामान्यांच्या ठेवींपासून ते दैनंदिन व्यवहारासाठी बोर्लीमधील बँक ऑफ महाराष्ट्र एकमेव शाखा आहे. त्यामुळे नेहमी गर्दी पहायला मिळते. श्रीवर्धन तालुका तसा दुर्गम भाग आहे. आजही, येथे अनेकांवर दिवसभर मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवायची जबाबदारी आहे. त्यातून रक्कमेचा भरणा, केवायसी, तसेच अनेक योजनेतून मिळणारे लाभ घेण्यासाठी जेष्ठ महिला, आबाल वृद्ध रांगेत उभे राहतात. मात्र, बँकेत स्लीप भरणे इतर माहिती देण्यासाठी सुविधा नसल्याने तासनतास उभे राहून नागरिकांना मानसिक त्रास होऊन वेळ वाया जात आहे. यापुर्वी या शाखेत 7 ते 8 कर्मचारी कार्यरत होते. परंतु, आता तेथे फक्त 4 कर्मचारी काम करीत असल्याने ग्राहकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.