अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लाखोंची लूट
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यात जमीन घोटाळ्यांचे भयंकर रॅकेट उघडकीस येत आहे. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून, अडगळीच्या जागांवर फसवी कार्यालये उघडून, खऱ्या कागदपत्रांत हेराफेरी करून लाखोंच्या जमिनींची लूट सुरू आहे. या घोटाळ्यात काही राजकीय पक्षांचे पदाधिकारीही अग्रेसर असून, ‘खोटे कागद खरा व्यवहार’ या सूत्रावर राजकारण आणि भ्रष्टाचाराचा खेळ रंगत आहे. मूळ जमीनधारकांची कागदपत्रे मिळवायची, त्यात कायदेशीर पॉलिश करून खोटी कागदपत्रे तयार करायची आणि नंतर ती जमीन बिनधास्त विकायची. धमकी देऊन तोंड बंद करायचे, हे या टोळक्यांचे काम बनले आहे, अशी चर्चा सध्या उरणमध्ये रंगत आहे.
या रॅकेटमध्ये काही भ्रष्ट शासकीय अधिकारी, दलाली करणारे समाजपदाधिकारी आणि हातसफाई करणारी राजकीय मंडळी देखील सहभागी असल्याचे बोलले जात आहे. हे लोक कोट्यवधींचा व्यवहार उरकून आपल्या खिशात लाखोंची खिरापत भरत आहेत. जमीन घेतलेल्या नागरिकांना खोटे बोलून गंडवणे आणि नंतर पोलीसी तक्रारीचे भूत दाखवणे ही त्यांची विशेषताच झाली आहे. या काळ्या धंद्यावर सिडको, महसूल आणि पोलीस प्रशासन मूग गिळून बसले आहेत. कारण अनेकांच्या खिशात या घोटाळ्याची उष्णता पोहोचत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनाची ही गेंड्याच्या कातडीची भूमिका संपूर्ण उरणकरांना महागात पडू शकते. भविष्यात या खोट्या व्यवहारांची कधी ना कधी चौकशी होणारच आहे. परंतु, याची झळ मात्र सामान्य खरेदीदारांना बसणार, अशी चर्चा उरणकरांमध्ये होताना दिसत आहे.






