| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायत हद्दीत प्रस्तावित असलेल्या टोरंट जलविद्युत प्रकल्पासाठी माती आणि दगड परीक्षण सुरू आहे. मागील 10 महिने या कामासाठी ड्रिलिंग करण्याची कामे सुरू असल्याने या भागात पहिल्यांदा भूस्खनन होण्याच्या घटना घडल्या. साई डोंगर परिसरात प्रथम अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आणि झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
पाली तर्फे कोतवाल खलाटी या ग्रामपंचायतीमध्ये टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी गेल्या वर्षापासून माती आणि दगड परीक्षण केले जात आहे. त्यासाठी प्रस्तावित धरणाच्या परिसरात विविध ठिकाणी जमिनीमध्ये आणि खडकामध्ये ड्रॉलिंग केले जात आहे. त्या त्या ठिकाणी जमिनीच्या भूगर्भातून माती काढून, तर काही ठिकाणी खडकातून काढलेल्या दगडाचे परीक्षण काम सुरू आहे .त्याचा मोठा परिणाम यावर्षी पहिल्याच पावसात दिसून आला आहे. साई डोंगर भागात यापूर्वी कधीही भूस्खनन होण्याच्या घटना घडल्या नव्हत्या. या भागात डोंगरातील माती खाली पडण्याची घटना घडलेली नसल्याने माती परीक्षण करण्यासाठी केले जाणारे ड्रिलिंगमुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती मागील काही महिने सतत व्यक्त केली जात होती. पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते पप्पू देशमुख यांच्याकडून प्रकल्प जाहीर झाल्यापासून गावागावात जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास कसा होणार हे सांगत होते. मात्र, त्यावेळी त्यांचे कोणी ऐकले नाही आणि मालकी जमिनीमध्ये ड्रिलिंग करण्याचे काम सुरू झाले. जमिनी विकत आणि भाडेतत्वावर देखील घेतलेल्या नसताना सुरू असलेले ड्रिलिंगमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. परंतु, प्रशासन गुजरात राज्यातील कंपनीच्या मागे ठामपणे उभे असल्याने दिसून येत आहे.
साई डोंगर भागात दरड कोसळली
