नागोठणे रोहा राज्य मार्गावर बंद झालेली वाहतूक चार तासांनी सुरू
| नागोठणे | महेश पवार |
सोमवारी रात्रीपासून पाडणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.15) सकाळी आणखीनच वाढला. सकाळपासून पाडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडालेला असतांनाच रोहा येथे जाण्यासाठी मुख्य राज्य मार्ग असलेल्या नागोठणे- रोहा रस्त्यावर भिसे खिंडीत जोरदार पावसामुळे तीन ठिकाणी महाकाय वृक्ष व दरड कोसळली.
तुफानी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे डोंगरातील लहान मोठे दगड रस्त्यावर वाहून आले व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलही झाला होता. त्यामुळे नागोठणे- रोहा मार्गावर वाहतूक बंद झाली होती. या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आपली वाहने कोलाड मार्गे मोठा वळसा घालून न्यावी लागली. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने कामानिमित्त रोहा येथे जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे व वाहन चालकांचे हाल झाले. मोठ्या रहदारीच्या या रस्त्यावर एखाद्या वाहनावर ही झाडे पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने तसे काही न घडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील भिसे खिंडीत नागोठणे बाजूकडून रोहा बाजूकडे जाताना नागोठणे बाजूकडील उतारावर तीन ठिकाणी झाडे पडून मातीही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली होती. या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे रोहा शाखा अभियंता एम.एम. घाडगे यांच्यासह बांधकाम खात्याचे 5 ते 6 कर्मचारी तसेच नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलिस कर्मचारी संदेश सानप, स्वप्नील भालेराव, चालक महाले अशी सार्वजनिक बांधकाम खाते व पोलिसांची सर्व टीम घटनास्थळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोचली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बोलवण्यात आलेल्या तीन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे व दरड चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाजूला करण्यात आली. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नागोठणे- रोहा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत झाला. दरम्यान वन खात्याच्या अडथळ्यामुळे पडायला आलेली झाडेही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून उन्हाळ्यात तोडण्यात येत नसल्याने पावसाळ्यात ही मोठ- मोठी झाडे उन्मळून पडत आहेत. त्याचा नाहक त्रास वाहन चालक व नागरिकांना होत आहे. त्यामुळे वाहनांवर झाडे कोसळून एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी वनखाते व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सामंजस्याने यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.