बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका

बांधकामांवर तात्काळ कारवाईची मागणी

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

वाढत्या भूस्खलन धोक्याचा इशारा देत सुमारे 200 नागरिक आणि पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी (दि.22) सकाळी बेलापूरच्या मुख्य चौकात तिसरी मानव साखळी तयार करण्यात आली. अनियंत्रित आणि कथित बेकायदेशीर बांधकामांपासून संवेदनशील बेलापूर टेकड्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपला लढा तीव्र केला.

सेव्ह बेलापूर हिल्स फोरम आणि नॅटकनेक्ट फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भूस्खलनप्रवण उतारांवर उभ्या असलेल्या सुमारे 30 अनधिकृत बांधकामांविरोधातील प्रशासनाच्या दीर्घकालीन निष्क्रियतेचा मुद्दा मांडण्यात आला. आरटीआयमार्फत सिडकोकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बांधकामे सुमारे 2.3 लाख चौरस फूट सार्वजनिक जागेवर पसरलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून जमीन सपाट केल्यामुळे टेकडीची माती सैल झाली आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगासमोर दिलेल्या पाडकामाच्या आदेशांनंतरही ही बांधकामे उघडपणे वाढत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. सिडको मुख्यालयातून स्पष्ट दिसणाऱ्या या टेकड्या आता प्रशासकीय ठप्पपणाचे प्रतीक बनल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत हे तिसरे आंदोलन आहे. एप्रिल 2024 मध्ये वृक्षउत्पाटनानंतर भूस्खलनाच्या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि फेब्रुवारी 2025 मध्ये आयोगाच्या निर्देशांचे पालन न झाल्याच्या निषेधार्थ मानव साखळी करण्यात आली होती.

Exit mobile version