द्रुतगती महामार्गावर भूसुरुंगाच्या स्फोटाने घरांना तडे

ढेकू ग्रामस्थ आक्रमक; अफकॉन कंपनीवर कारवाईची मागणी
। खोपोली । वार्ताहर ।
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात झालेल्या भूसुरुंग स्फोटाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. स्फोट इतका भीषण होता की मोठमोठे दगड ढेकू गावातील घरांवर आदळल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील यांनी केली आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी तहसीलदार आयुब तांबोळी आणि पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना निवेदन देवून अफकॉन कंपनीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. बोरघाटात नव्या चार पदरी मिक्सिंग लिंकचे काम सुरू असताना डोंगर पोखरण्याचे काम जोमाने सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात भूसुरुंग स्फोट घडवून आणले जात आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अफकॉन कंपनीने भूसुरुंग स्फोट घडवला. स्फोटातील महाकाय दगड, गोटे द्रुतगती महामार्गाशेजारी असणार्‍या ढेकू गावात जाऊन पडले त्यामुळे नुकसान झालेल्या घरांची भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ढेकू ग्रामस्थ, अफकॉन कंपनीच्या अधिकार्‍यांची खोपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ग्रामस्थांनी अफकॉन कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनीही या प्रकरणी कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित देशमुख, पांडुरंग कदम, नितीन पतील, प्रकाश जळगावकर, राज ढमाले, उमेश वरघडे, आकाश पाटील, राहुल भोईर, कुणाल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version