मोठ्या बसेसमुळे स्थानिकांची डोकेदुखी

पाच मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहरात सहलीच्या येणाऱ्या मोठ्या बसेसमुळे स्थानिक नागरिकांना डोकेदुखी होत असल्याची बाब समोर आली आहे. कारण श्रीवर्धन शहरातील सर्वच रस्ते प्रचंड अरुंद आहेत. मोठ मोठ्या दोन बसेस समोरून आल्यानंतर त्या पास होताना दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो. एकावेळी एकाच विद्यालयाच्या किंवा महाविद्यालयाच्या पाच पाच बसेस लागोपाठ असतात. तर त्या अगोदर शहरात आलेल्या बाहेर पडणाऱ्या बसेस देखील रांगेमध्ये पाच ते सहा असतात. त्यामुळे सदरची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जातो.

घरातून बाजारात दूध आणण्यासाठी गेलेल्या नागरिकाला देखील एक एक तास वाया घालवावा लागतो. वाहतूक कोंडीची ही समस्या लक्षात घेऊन श्रीवर्धन पोलिसांनी सहलीच्या येणाऱ्या बसेस श्रीवर्धन बस स्थानकामध्येच थांबवून विद्यार्थ्यांना पायी समुद्रकिनाऱ्यापर्यंत पाठवावे. अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. जे विद्यार्थी श्रीवर्धन येथे वस्तीसाठी असतात अशाच लोकांच्या बसेस शहरामध्ये पाठवाव्या. जे सहलीला येणारे विद्यार्थी फक्त समुद्रकिनारा पाहून लगेच परत जाणारे असतात अशा सहलींच्या बसेस श्रीवर्धन स्थानकावर उभ्या करून ठेवाव्यात. जेणेकरून श्रीवर्धनमधील स्थानिक नागरिकांना या सहलींचा त्रास होणार नाही.

या येणाऱ्या सहलींपासून श्रीवर्धनमधील स्थानिक नागरिकांना एक रुपयाचा देखील फायदा नसतो. कारण या ठिकाणी येणाऱ्या बहुतांश सहलींचे आयोजक उघड्यावरती अन्न शिजवून विद्यार्थ्यांना जेवण वाढतात. त्यामुळे या ठिकाणच्या हॉटेल व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारचा धंदा उपलब्ध होत नाही. श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाने देखील रस्ता रुंदीकरण करण्याकडे तातडीने लक्ष द्यावे. जेणेकरून श्रीवर्धनमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. रस्ता रुंदीकरणासाठी लोकांच्या जागेवरती खुणा देखील करून ठेवलेल्या आहेत. परंतु स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे रुंदीकरण रखडून पडलेले आहे. तरी नगर परिषदेने रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी श्रीवर्धनच्या नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version