जि.प.सभापती दिलीप भोईर यांचा पुढाकार; अडीच हजार नागरिकांना दोन दिवसात डोस
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्ह्यामध्ये कोरोनाची लस मिळत नसल्याने नागरिकांचे हाल झाले होते.जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीतून अडीच हजार नागरिकांसाठी दोन दिवस लसीकरणाची मोहिम झिराडमध्ये राबवली.गुरुवारी पहिल्या दिवशी एक हजार दोनशे नागरिकांना लस दिली असून शुक्रवारी एक हजार 300 नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
रायगड जिल्हयात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील नागरिक लसीपासून वंचित राहू लागले आहेत . दुसरा डोस घेणार्यांची मुदत संपूनही लस मिळत नाही.त्यात पहिला डोस घेणार्यांना ताटकळत रहावे लागत आहे . लसीसाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असताना प्रशासनाकडून पुरेसे लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप निर्माण होत आहे. नागरिकांची ही समस्या ओळखून शासनाच्या एक पाऊल पुढे टाकत जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी पुढाकार घेत अलिबाग तालुक्यातील झिराड या ठिकाणी दोन दिवस लसीकरणाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील अनेक गावांमधील अडीच हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार गुरुवारी झिराड येथील प्राथमिक शाळेत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला .
एका दिवसात एक हजार 200 नागरिकांना डोस देण्यात आला असून अन्य नागरिकांना एक हजार 300 डोस शुक्रवारी दिले जाणार आहे . या लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. लसीसाठी प्रचंड गर्दी झाली . यावेळी झिराड ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य ग्रामविकास अधिकारी कर्मचारी , झिराड येथील साई क्रीडा मंडळ व महिला मंडळाचे पदाधिकारी सदस्यांनी योग्य पद्धतीने नियोजन केले . नोंदणी पासून लसीकरणापर्यंत लाभार्थ्यांना रांगेत उभे राहण्यापासून बसण्याची व्यवस्था केली होती . मुंबई येथील ब्रिज कँन्डी रुग्णालयातील डॉक्टर अनिरुद्ध कोळी , 5 डेटा एन्ट्री ऑपरेटर ,6 नर्स यांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले .
प्रशासनाकडून लस उपलब्ध होत नसल्याने दुसरा डोस घेताना अडथळे निर्माण झाले होते . झिराड मध्ये घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लस घेता आली .
तुषार थळे – लाभार्थी
कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे . आतापर्यंत मापगाव मतदार संघासह रेवदंडा व अन्य भागातील सात हजार दोनशे नागरिकांना लस उपलब्ध करून दिली आहे .
दिलीप भोईर, समाज कल्याण सभापती रायगड जिल्हा परिषद
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे झाले होते . परंतू लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लस घेता येत नव्हती . झिराड येथे विशेष मोहीम घेण्यात आली त्यामुळे मला लस घेता आली .
मधुश्री टेमकर – महिला ( वाडगाव )