राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून आदरांजली
| मुंबई | प्रतिनिधी |
नाम गुम हो जायेगा,चेहरा ही बदल जायेगा,मेरी आवाज ही पेहचान है, अस अभिमानाने सांगत गेली सत्तर वर्षाहून अधिक काळ समस्त भारतीयांच्या मनावर आपल्या स्वरांची मोहिनी घालणार्या गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी अशी बिरुदे मोठ्या अभिमानाने छातीवर मिरविणार्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण लता मंगेशकर (वय 93) यांनी रविवारी या जगाचा निरोप घेतला आणि चार पिढ्यांशी जुळलेला स्वररुपी युगाचा अंत झाला. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले.त्यांच्या निधनाने अवघा देश शोकाकूल झाला असून,त्यांच्या निधनाबद्दल दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा व्यक्त करण्यात आला आहे.
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.वैंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, बॉलीवूड, मराठी चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी शोक प्रकट केला आहे. अशी लता पुन्हा होणे नाही. अशा भावपूर्ण शब्दात सर्वच मान्यवरांनी लतादीदींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.रविवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवार सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी अवघ्या देशवासियांचे डोळे पाणावले होते.
गेल्या काही दिवसांपासून लतादीदी यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात गेले 27 दिवस उपचार सुरु होते.
भारतरत्नाने सन्मान
लता मंगेशकर यांना 1969 मध्ये पद्मभूषण, 1999 मध्ये पद्मविभूषण आणि 2001 मध्ये मभारतरत्नफ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना 2009 मध्ये मऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनरफ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर या मभारतरत्नफ पुरस्कार प्राप्त करणार्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न – 1998) नंतर दुसर्या महिला गायिका आहेत.
30 हजार गाण्यांचे रेकॉर्डिंग
लतादीदींनी वयाच्या 13 व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 1942 मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली. मएक प्यार का नगमा हैफ, मराम तेरी गंगा मैलीफ, मएक राधा एक मीराफ आणि मदीदी तेरा देवर दीवानाफ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढविला होता.
लतादीदींच्या गाण्यातील वैविध्य, दैवी सूर यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांनी आवाजातून भारताचं सौंदर्य मांडलं. भारतरत्न लतादीदींची कारकीर्द कालातीत आहे. शतकातून एकदा असा कलाकार जन्म घेतो. माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व भारावून टाकणारं होतं. दैवी आवाज आपल्याला सोडून गेला आहे. पण त्यांची गाणी चाहत्यांच्या मनात कायम राहतील. – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे झालेले दुःख हे शब्दांच्याही पलिकडचे आहे. लतादीदी आपल्याला सोडून गेल्या आहेत. त्यांच्या जाण्यामुळे देशामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन काढता येणे शक्य नाही. येणार्या अनेक पिढ्यांना त्या कायम स्मरणात राहतील. लता मंगशकर यांच्या आवाजामध्ये लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अशी क्षमता होती. – नरेंद्र मोदी,पंतप्रधान
लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले.त्या देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
