‘लेट लतिफ’ डॉक्टरांचा रुग्णांना फटका

माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार; उपचारासाठी बसावे लागते ताटकळत

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात निर्धारित वेळेच्या एक ते दीड तास उशिरा येणार्‍या आणि एक ते दोन तास लवकर जाणार्‍या ‘लेट लतिफ’ काही डॉक्टरांचा फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. उशिरा येणार्‍या डॉक्टरांमुळे रुग्णांना कित्येक तास प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक रुग्ण मोफत उपचार घेण्याऐवजी खासगी दवाखान्याचा रस्ता पकडत आहेत. अशा कामचुकार डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. काही डॉक्टरची पदे रिक्त आहेत, तर अनेक कर्मचार्‍यांची पदेही रिक्त आहेत. तात्पुरत्या स्वरूपात काही डॉक्टर अर्धवेळ, तर काही पूर्णवेळ काम करतात. मात्र, या डॉक्टरांचे आठवड्यातील वार ठरलेले आहेत. त्यांच्या वॉर्डबाहेर फलकावर आठवड्याचे दिवस लिहिले आहेत. मात्र, वेळा लिहिलेल्या नाहीत. तसेच संबंधित डॉक्टरांच्या संपर्कासाठी मोबाईल नंबर लिहिणे गरजेचे आहे. जेणे करून एखाद्या रुग्णाला संबंधित डॉक्टरांकडे संपर्क करता येईल, तसेच त्या डॉक्टरांची वेळ पाहून उपचारासाठी येणे सोयीस्कर होईल. याबाबत कुठेही सूचना फलकावर लिहिलेल्या नाहीत. त्यामुळे मर्जीप्रमाणे काही डॉक्टर रुगणालयात येऊन काम करतात. तर, काही डॉक्टर वेळेपूर्वीच निघून जातात. याठिकाणी काम करणार्‍या काही डॉक्टरांना राजकीय वरदहस्त असल्याने ते मर्जीप्रमाणे वागत आहेत. याबाबत रुग्णांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. गोमसाळे नेत्र चिकित्सक यांच्याकडे संपर्क साधला असता, त्यांनी अशा संबधित डॉक्टरांना समज देऊन वेळेनुसार रुग्णालयात काम पाहावे अशा सूचना देणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version