उशिरा येणारा पाऊस

यंदा पाऊस उशिराने येईल असा अंदाज सरकारी व खासगी वेधशाळांनी वर्तवला आहे. नेहमी एक जूनला केरळात येणारा पाऊस आता चार ते आठ दिवस उशिरा येण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर सुरुवातीला कमी राहील असाही अंदाज आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरण्यांची घाई न करू नये असा सल्ला शेतीतज्ज्ञांनी दिला आहे. पण पाऊस चार-सहा दिवस आधी किंवा नंतर आल्याने फार नुकसान होणार नाही. एकूण चार महिन्यांमधील पाऊसमान कसे राहील, हा अधिक कळीचा मुद्दा आहे. आतापर्यंत तरी पाऊस सर्वसाधारण होईल असे दिसत आहे. मात्र एल निनोच्या प्रभावामुळे हे सर्व गणित बिघडू शकते. प्रशांत महासागरातील एल निनो नावाने ओळखले जाणारे उष्ण प्रवाह हे भारतातील मान्सूनवर परिणाम करीत असतात. यंदा हा परिणाम ठळकपणे जाणवेल आणि त्यामुळे पाऊस कमी होईल असे संशोधकांचे म्हणणे आहे. एल निनोच्या प्रभावामुळे भारताच्या अनेक भागात अवर्षण किंवा दुष्काळ पडल्याच्या घटना गेल्या पंधरा-वीस वर्षात अनेकदा घडल्या आहेत. यावर पाण्याची बचत करणे, कमी पाण्यावर येणार्‍या पिकांना अधिक प्राधान्य देणे असे प्रकार आपण पूर्वीही केले आहेत. यंदाही त्या मार्गाने जावे लागेल असे दिसते. शिवाय हा परिणाम वेगवेगळ्या भागांत वेगवेगळा होईल. याचा आधीच अचूक अंदाज वा आकलन करण्याची शक्ती आपल्या विज्ञानाने पुरतेपणाने कमावलेली नाही. त्यामुळे सरकारला धोरणात्मक निर्णय घेऊन त्यातील प्रश्‍नांवर मात करावी लागेल. पाण्याचा वापर मर्यादेने करणे आणि पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे हे करावे लागेल. पावसाळ्याचा हंगाम चार महिन्यांचा असला तरी अलिकडे प्रत्यक्ष पाऊसमानाचे दिवस झपाट्याने कमी होऊ लागले आहेत. 120 दिवसांपैकी जेमतेम तीस दिवस खर्‍या पावसाचे असतात. त्यातही एखाद्या दिवसाच्या काही तासांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामुळे हंगामाच्या शेवटी पावसाचे प्रमाण 96 ते 105 टक्के यामध्ये दिसत असले तरी प्रत्यक्षात हव्या त्या वेळी व हव्या त्या ठिकाणी पाऊस पडलेला असेलच याची खात्री देता येऊ शकत नाही. दुसरे म्हणजे आता वर्षाच्या बाराही महिन्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या भागात पाऊस पडण्याच्या बातम्या येत राहतात. रबीच्या हंगामात होळीच्या दरम्यान व नंतर पडणार्‍या अवकाळी पावसाचे व गारपीटीचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. दीर्घ काळात या सर्वाचा जूनमध्ये सुरू होणार्‍या नेहमीच्या मोसमी पावसावर परिणाम होणार आहे. नव्हे, तो आताच होऊ लागला आहे. मानवाने चालवलेली अनिर्बंध जंगलतोड, डोंगरतोड आणि तो करीत असलेले प्रदूषण यामुळे पावसाचे चक्र बिघडत चालले आहे. गेल्या पाच वर्षे पाऊस समाधानकारक होता. यंदा तो कमी असण्याची एक शक्यता आहे. यामुळे शेतकरीच नव्हे तर नळाला पाणी येणारच असे गृहित धरणार्‍या शहरी लोकांनाही झटका बसू शकेल.

Exit mobile version