। बोर्ली पंचतन । वार्ताहर ।
शेत जमिनीच्या मालकी हक्कात मयत खातेदारांच्या नावांची सातबारा उतार्यावरून नोंद कमी करून त्यांच्या अधिकृत वारसांची नावे लागण्यासाठी 1 एप्रिलपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत आहे. श्रीवर्धन महसूल प्रशासनाच्या सूचनेनुसार तालुक्यातील शेखाडी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि.2) श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील, ग्राम महसूल अधिकारी प्रदीप देवकांत, ग्रामपंचायत अधिकारी हरीश मेंदाडकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेबद्दल मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर यांनी चावडी वाचनाच्या माध्यमातून मयत खातेदार व त्यांच्या वारसांबद्दल माहिती घेतली. यावेळी सरपंच बबन पाटील, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच नारायण कांबळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धर्मा बांद्रे, शांताराम बांद्रे त्याचबरोबर ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते.