डागडुजीच्या नावाखाली थुकपट्टी

ऐन गणेशोत्सवात अपघाताला आमंत्रण; कुरुळ-बेलकडे फाटा रस्त्यावर खडीचा मुलामा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे बुजवून वाहनचालकांना दिलासा देण्याऐवजी कुरुळ ते बेलकडे फाटा रस्त्यावर डागडुजीच्या नावाखाली चक्क खडी पसरवून थुकपट्टी करण्यात आली आहे. खड्ड्यांवर खडी टाकून ती व्यवस्थित दाबली किंवा आवश्यक साहित्याचा वापर न केल्याने ही खडी रस्त्यावरच पसरली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, बांधकाम विभागाने दुरुस्तीऐवजी अपघाताला आमंत्रण दिल्याचा संताप प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे फाटा ते कुरुळ या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. खड्ड्यांची दुरुस्ती करण्याकडे बांधकाम विभागाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने त्यांचा आकार आणि संख्या वाढत गेली.

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाकडून बांधकाम विभागाला देण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावरील खड्डे व्यवस्थित बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित होईल, अशी अपेक्षा वाहनचालकांना होती. मात्र, प्रत्यक्षात बांधकाम विभागाने खड्ड्यांवर केवळ खडी पसरवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून येत आहे. खडीखाली आवश्यक माल टाकण्यात न आल्याने आणि ती व्यवस्थित रोलरने दाबण्यात न आल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खडी पसरली आहे.

सध्या गणेशोत्सवासाठी खरेदी करण्याकरिता अलिबागकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच गणेशोत्सवासाठी मुंबई, नवी मुंबईसह अन्य भागांतून कोकणात येणारे चाकरमानीही या मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असताना रस्त्यावर पसरलेली खडी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.

विशेषतः दुचाकीस्वारांना या खडीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अचानक ब्रेक लावल्यास किंवा वाहनाचा वेग किंचित वाढल्यास खडीवरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती आहे. चारचाकी आणि अन्य वाहनांनाही खडीमुळे वाहनावर नियंत्रण ठेवताना अडचणी येत आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्याऐवजी रस्त्यावर खडी पसरवून बांधकाम विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ सुरू केल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

एकीकडे प्रशासनाकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षित करण्याचे आदेश दिले जात असताना दुसरीकडे संबंधित विभागाकडून दुरुस्तीच्या नावाखाली वरवरची मलमपट्टी केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक दर्जाचे साहित्य वापरून रस्ता मजबूत करण्याऐवजी केवळ खडी पसरविण्याचा प्रकार नेमका कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या निकषांवर करण्यात आला, असा सवालही उपस्थित होत आहे.

या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमएसआयडी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कोणत्या पद्धतीने करण्यात आले, त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला आणि कामाचा दर्जा कोण तपासणार, असे प्रश्नही आता उपस्थित झाले आहेत.

प्रवाशांकडून संताप व्यक्त 
गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांना सुरक्षित रस्ता देण्याऐवजी खड्ड्यांवर खडीचा मुलामा देऊन बांधकाम विभागाने आपली जबाबदारी पार पाडल्याचा केवळ देखावा केला आहे. ही थुकपट्टी तातडीने दूर करून रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करावी, अन्यथा या मार्गावर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि प्रवाशांकडून केला जात आहे.
धुळीमुळे आरोग्याचाही प्रश्न
रस्त्यावर पसरलेली खडी आणि त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे वाहनचालक व प्रवाशांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे कण हवेत उडून नाका-तोंडात जात आहेत. त्यामुळे डोळे, नाक आणि श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक या मार्गावरून प्रवास करणार असल्याने हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
Exit mobile version