महायुतीतील जागा वाटपावर दिल्लीतील नेते नाराज


| मुंबई | प्रतिनिधी |

19 एप्रिल रोजी राज्यसह देशातील पहिल्या टप्प्याचे लोकसभेचे मतदान होत आहे. मात्र, अजूनही राज्यातील महायुतीमध्ये जागावाटपावरून अंतिम निर्णय झालेला नाही. काही जागांवरून महायुतीत एकमत होत नसल्यामुळं राज्यातील काही जागांचा तिढा कायम आहे. मात्र, महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपा या पक्षातील नेत्यांनी जागांवरुन केलेल्या दाव्यामुळं दिल्लीतील भाजपाचे पक्षश्रेष्ठी, महाशक्ती नाराज असल्याचं समजतंय. महायुतीतील नेत्यांनी केलेली वेगवेगळी वक्तव्यं हे महाशक्तीच्या निदर्शनास आल्यामुळं महाशक्ती नाराजी व्यक्त करत आहेत.

महायुतीत चार ते पाच जागांचा अद्याप तिढा कायम आहे. या जागांवर महायुतीतील नेत्यांमध्ये एकमत होत नाही. त्यामुळे या जागांवर महायुतीत तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे. दरम्यान, नाशिक, ठाणे, दक्षिण मुंबई आणि पालघर या जागेवर महायुतीने अद्यापपर्यंत उमेदवार दिलेला नाही. परंतु, या जागेवरून भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच या ठिकाणी आपल्या पक्षाचा दावाही करण्यात येत आहे. नाशिक, ठाणे या जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. मात्र, नाशिक जागेवर राष्ट्रवादीनं दावा केला असून, येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे. तसेच दक्षिण मुंबईतून योग्य उमेदवार मिळत नसल्यामुळे या जागेवरील तिढा सुटत नाही आहे. येथे कुठला उमेदवार द्यावा हे महायुतीसमोर आव्हान आहे.

उमेदवारी आणि जागा वाटपावरून महायुतीतील नेत्यांची वेगवेगळी मत आणि त्यांच्या प्रतिक्रिया लोकांमध्ये जात आहेत. यामुळं लोकांमध्ये, मतदारांमध्ये एक वेगळा नकारात्मक मेसेज जाऊ शकतो. चुकीचं संदेश जाऊ शकतो. त्यामुळं भाजपाबद्दल किंबहुना महायुतीबद्दल लोकांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. नेत्यांच्या वेगळ्या बोलण्यामुळं आपल्यामध्येच एकी नसल्याचा चित्र लोकांमध्ये जाऊ शकते. त्याचा परिणाम मतदानावर पडू शकतो, असं महाशक्तीने म्हटलंय. याच कारणामुळं महाशक्तीने नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version