। उरण । वार्ताहर ।
फुंडे रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयात मंगळवारी (दि.7) रयत ब्राइट एलईडी बल्ब बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. महाविद्यालयाच्या इन्क्युबेशन सेल आणि आयटी व भौतिकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना एलईडी बल्ब तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव देणे आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाशयोजनांना प्रोत्साहन देणे हा होता.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांच्या प्रेरणादायी संदेशाने झाले. त्यांनी रयत ब्राइट एलईडी बल्बमागील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि ऊर्जा कार्यक्षम प्रकाशयोजनांचे फायदे उलगडून सांगितले. दीर्घायुष्य, उच्च कार्यक्षमता, पर्यावरण पूरकता, टिकाऊ गुणवत्ता, शून्य अल्ट्राव्हायोलेट उत्सर्जन आणि डिझाइन लवचिकता यासह ग्रीन एनर्जीच्या संकल्पनेला पाठबळ देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी वाशीयेथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉ. परेश गायकर उपस्थित होते. त्यांनी एलईडी तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती देत पारंपरिक प्रकाशयोजनांच्या तुलनेत एलईडीचे कार्यक्षमतेतील आणि पर्यावरणीय फायद्यांतील उत्कृष्टत्व स्पष्ट केले. प्रत्येक सहभागीला एलईडी बल्ब तयार करण्यासाठी लागणार्या सर्व घटकांचे किट देण्यात आले. डॉ. गायकवाड यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एलईडी बल्ब तयार करण्याच्या टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण केली.
या कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी तयार केलेले एलईडी बल्ब सादर केले. या उपक्रमात 70 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. आरएपीसी समिती आणि इन्क्युबेशन सेलचे प्रमुख डॉ. गुरुमीत सी. वाधवा, आयटी विभागप्रमुख अर्जुन पाटील, आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख आचल बिनेदार यांच्या उपस्थितीने या कार्यशाळेचे यश अधिक वाढले.