। अलिबाग । प्रतिनिधी ।
आजच्या परिस्थितीत देशाबरोबरच राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी डाव्या पक्षांची एकजूट गरजेची आहे. डाव्या पक्षाचे कार्यकर्ते वैचारिकदृष्ट्या पक्के आहेत. शेतकरी, कामगारांच्या हिताबाबत भूमिका व बांधिलकी आहे. आगामी काळात एक वेगळ्या भमिकेतून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) 24 व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशन 27 फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत परभणीमधील सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, कॉ. सीताराम येच्युरी आणि व्यक्तीशः चांगले संबंध होते. त्यांची आठवण कायमच राहण्यायोग्य आहे. डाव्या विचाराच्या पक्षाला एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. बदलत्या राजकारणाबरोबरच समाजातील परिस्थितीचा विचार केला असता, सध्याची परिस्थिती भयावह आहे. आपल्या सर्वांना एकत्र येऊन एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे, असे जयंत पाटील म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले, डाव्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या एकजुटीसाठी अलिबागमध्ये दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी उपस्थितांनी एकमुखाने मान्यता दिली.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक कॉ. प्रकाश कारत, माजी खा. निल्लोतन बसू, डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, डॉ. अजित नवले, डॉ. डी.एल. कराड, माजी आ. नरसय्या आडाम, माजी आ. जीवा गावीत, कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. राम बाहेटी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले, अजित पाटील, लाल निशान पक्षाचे कॉ. भीमराव बनसोड, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन सचिव राजू कोरडे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.