रायगडात लिंबूचे भाव वधारले

10 रुपयांना एक लिंबू

| पाली /बेणसे | वार्ताहर |

हिवाळा नुकताच सरला असून उन्हाची काहिली आता वाढू लागली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा देण्यासाठी व ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबू पाणी व सरबत सर्वात उत्तम पर्याय आहे. मात्र, मागील महिन्याच्या तुलनेत सध्या लिंबाचे भाव वधारले आहेत. किरकोळ बाजारात मागील महिन्यात दहा रुपयांना दोन मिळणारे लिंबू आता चक्क दहा रुपयांना एक मिळत आहे.

डॉक्टर देखील उन्हाळ्यात लिंबू सरबत पिण्याचा सल्ला देतात. लिंबाला मागणी वाढत आहे. तसेच, उसाचा रस काढताना देखील लिंबू लागतो. मात्र आवक कमी आणि किंमत जास्त यामुळे लिंबाने सर्वांना घाम फोडला आहे. लिंबाचे भाव वाढल्याने लिंबू सरबताचे भाव देखील आपोआप वाढले आहेत. हॉटेलच्या प्लेटमधून देखील आता लिंबू गायब होऊ लागला आहे. मोठे लिंबू तर सध्या बाजारात पहायला देखील मिळत नाहीत. किंमती वाढल्या असल्या तरी आरोग्यवर्धक लिंब खरेदी केली जाते.


घाऊक बाजारात लिंबाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आपोआप किरकोळ बाजारात किंमत वाढली आहे. तसेच, सध्या आवक देखील कमी आहे.

राजेश फोंडे,
भाजी विक्रेता, पाली
Exit mobile version