माथेरानमध्ये बिबट्याच्या पिल्लांचा संचार

वन ट्री हिल, अमन लॉज परिसरात दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या जंगल भागात वनसंपदा वाढली आहे, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात या वनसंपदेमुळे बिबट्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवस सातत्याने बिबट्याचे दर्शन घडत असून, दिवसा देखील बिबट्याचे दर्शन होत असल्याने काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान माथेरानमध्ये दर्शन होत असलेले दोन लहान पिल्ले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

माथेरान या जंगलाने व्यापलेल्या भागात बिबट्याचे प्रमाण वाढले असल्याचे त्याच्या वास्तव्याने स्पष्ट होत आहे. मागील काही दिवस सातत्याने बिबटे आपले दर्शन देत आहेत. प्रामुख्याने वन ट्री हिल परिसर आणि अमन लॉज स्टेशन परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे त्याच्या दर्शनाने स्पष्ट होत आहे. मागील काही दिवसात अमन लॉज स्टेशन परिसरात टॅक्सी स्टँड, अमन लॉज बंगला तसेच बेकरा रोड आदी परिसरात प्रामुख्याने रात्रीच्या वेळी बिबट्याने दर्शन झाले असून, तो बिबट्या बछडा असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे.

माथेरान शहरातील वन ट्री हिल परिसरात मागील काही दिवस सातत्याने बिबट्याचा बछडा दिसत आहे. या भागातील कॅसल रोड, कॉन्व्हेन्ट स्कूल, शारदा व्हिला या भागात बिबट्याचे दर्शन झाले आहे. अनेक ठिकाणी बिबट्याचे रात्रीचे वेळी दर्शन झाले आहे, पण या भागातून नगरपरिषदेची रुग्णवाहिका जात असताना बिबट्या दिवसा देखील नजरेस पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात या भागात माथेरान मधील दोन शाळा आहेत आणि त्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक घाबरले आहेत.

शहरात ज्या दोन ठिकाणी शाळा आहेत त्या भागात आता दिवसा देखील बिबट्याचे दर्शन झाल्याने पालक वर्गाचे वतीने प्रामुख्याने ई रिक्षा यांची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी कायम ठेवावी आणि विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी अशी सूचना आहे.

कल्पना पाटील
माजी मुख्याध्यापिका

आम्ही सातत्याने बिबट्याचे हालचाली यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. सध्या नजरेस पडत असलेले बिबटे हे पिल्ले असून, ती दोन पिल्ले असल्याचे दिसून येत आहे. साधारण एक वर्षे वयाचे ती पिल्ले असावेत असे दिसून आले आहे. मात्र, मादी बिबट्याचे दर्शन झाले नसल्याने त्याचा माग वन विभाग काढत आहे.

आर बी गायकवाड
वनक्षेत्रपाल
Exit mobile version