हनिमून पॉईंटवरील दुकानासमोर पाळीव कुत्र्याची शिकार
सीसीटीव्हीत घटना कैद; वन विभागाकडून सतर्कतेचे आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हनिमून पॉईंट परिसरातील गणेश सनगरे यांच्या घराबाहेर मध्यरात्री बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याची शिकार केली. ही संपूर्ण घटना घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, वन विभागाने या घटनेची दखल घेतली आहे.
रात्री सुमारे दीडच्या सुमारास हनिमून पॉईंट परिसरातील राजेंद्र टी अँड कोल्ड्रिंक्स येथे हा प्रकार घडला. दुकान चालविणाऱ्या ज्योती राजेंद्र सनगरे या त्यावेळी घरात एकट्याच होत्या. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकून त्यांनी बाहेर पाहिले असता मोठ्या आकाराचा बिबट्या पाळीव कुत्र्याची शिकार करत असल्याचे दिसले. त्यांनी धाडसाने आरडाओरड करून बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वीही 2010 मध्ये त्यांच्या घरासमोरील झाडावर बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली होती. काही महिन्यांपूर्वीही त्याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे हनिमून पॉईंट, लुईझा पॉईंट आणि आसपासच्या भागात बिबट्याचा सातत्याने वावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.
महिनाभरात अनेक हल्ले
सुमारे महिनाभरापूर्वी याच परिसरातील संदीप जाबरे आणि उज्वला चौधरी यांच्या घरातील पाळीव कुत्र्यांचीही बिबट्याने शिकार केली होती. काही दिवसांपूर्वी दस्तुरी नाका मार्गावरील माऊंटबेरी परिसरातही बिबट्याचे वारंवार दर्शन झाले होते. आता त्याचा वावर हनिमून पॉईंट आणि लुईझा पॉईंट परिसरात वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आम्ही सतत भीतीच्या वातावरणात राहतो. बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने रात्री एकटे घरी येताना नेहमीच जीव मुठीत धरावा लागतो. हल्ला झाला तर काय करायचे, अशी भीती कायम मनात असते.
– ज्योती सनगरे
माथेरानच्या जंगलात दोन ते तीन वर्षे वयोगटातील तीन बिबट्याचे बछडे वास्तव्यास आहेत. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे. जंगलालगत राहणाऱ्यांनी व पाळीव प्राण्यांच्या मालकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे.
– जयवंत चिमटे, वनरक्षक
