ग्रामस्थ भयभीत; गुरे व कुत्र्याची शिकार
| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील माणगाव बुद्रुक गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि.7) व बुधवारी (दि.8) रात्री गावात बिबट्या शिरल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले आहे. परिणामी, ग्रामस्थ भयभीत असून, या बिबट्याने एका कुत्र्याची शिकारदेखील केली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी तालुक्यातील माणगाव बुद्रुक परिसरातील पावसाळावाडी व उंबरवाडी गावातील गुरांना बिबट्याने ठार मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
या संदर्भात गुरुवारी (ता.9) वन विभागाचे वनक्षेत्रपाल विकास तरसे व कर्मचार्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना खबरदारीचे आवाहन केले आहे. वनक्षेत्रपाल विकास तरसे यांनी सांगितले की, गावात बिबट्या येत असल्याबाबत शहानिशा केली जाईल. त्यासाठी बिबट्याच्या पायांचे ठसे, त्याने केलेली शिकार आदी पुरावे शोधले जातील. मात्र, तोपर्यंत गावकर्यांनी सतर्क राहावे. रात्री घराबाहेर पडू नये.
माणगाव बुद्रुक गावाच्या आजूबाजूला डोंगर व जंगल आहे. जंगलात पाण्याची व अन्नाची कमतरता असल्याने बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधात गावात येण्याची शक्यता आहे. गावातील भटके कुत्रे हे बिबट्याचे सोपे शिकार असल्याने कुत्र्यांच्या शिकारीसाठी गावात बिबट्या येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
गावकर्यांना लागलीच भेटून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्यापासून संरक्षण कसे करावे व सुरक्षित कसे राहावे यासंदर्भात गावात पोस्टर लावण्यात येतील. गावात बिबट्या येत असल्याचे पुरावे शोधण्यासाठी ट्रॅप कॅमेरेदेखील लावण्यात येतील. त्यानंतर योग्य ती उपाययोजना वनविभागातर्फे केली जाईल.
विकास तरसे, वनक्षेत्रपाल, सुधागड-पाली
रक्षक वाघमारे, ग्रामस्थ
मागील दोन दिवसांपासून गावात बिबट्याचा वावर असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत आहेत. यासंदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली आहे आणि त्यानुसार वन विभाग अधिकारी व कर्मचार्यांनी गावाला भेट दिली. यासंदर्भात योग्य ती उपायोजना करण्यात यावी.