। नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वेच्या मेनलाईनवरील कर्जत या महत्वाच्या स्थानकात पॅसेंजर गाड्यांची ये जा असलेल्या फलाटावर असलेले वृत्तपत्र आणि पुस्तके मिळणारे स्टॉल दहा ते बारा वर्षापासून बंद आहे.
हक्काने वृत्तपत्र मिळतील असे हे ठिकाण गेली अनेक वर्षे बंद असल्याने रेल्वेकडून त्या ठिकाणी नवीन वृत्तपत्र विक्रेत्यास यास व्यवसाय करण्याची संधी देण्यात आल्यास दूरवर जाणार्या प्रवाशांना पुस्तके आणि वृत्तपत्र उपलब्ध होऊ शकतात. मुंबईकडून पुणे आणि दक्षिण भारतात जाणार्या एक्स्प्रेस गाड्या या कर्जत रेल्वे स्थानकात घाटातून प्रवास सुरू करण्याआधी अतिरिक्त इंजिन लावण्यासाठी किमान पाच मिनिटे थांबतात. त्यातील काही गाड्यांना कर्जत रेल्वे स्थानकातील थांबा हा टेक्निकल असतो. मात्र पुण्याकडे जाणार्या सर्व एक्स्प्रेस गाड्या किमान पाच मिनिटे कर्जत स्थानकात थांबतात आणि त्यामुळे प्रवासी हे स्थानकात वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी थांबून राहतात.
त्यावेळी दूरचा प्रवास असल्याने प्रवासी हे कर्जत स्थानकात असलेल्या वृत्तपत्र स्टॉलवरील पुस्तके आणि वृत्तपत्र यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करायचे. सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे वृत्तपत्र स्टॉल सुरू असायचे. मात्र 2012 मध्ये हे वृत्तपत्र स्टॉल बंद पडले आणि आजही ते केंद्र बंदच आहे. कर्जत सारख्या दक्षिणेकडे जाणार्या गाड्यांच थांबा असलेले महत्वाचे स्थानक वृत्तपत्र स्टॉल कायम बंद असलेले स्थानक आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी ठेकेदार असलेल्या कंपनीला वृत्तपत्र स्टॉल सुरू करण्यासाठी सूचना करायला सांगावे किंवा नवीन ठेकेदार नेमून वृत्तपत्र स्टॉल पुन्हा नव्या दिमाखात सुरू व्हायला हवे अशी मागणी प्रवासी करीत आहेत.