नेरळ रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम पूर्ण

शुभारंभासह 10 जूनचा मुहूर्त
। नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्टची सोय करावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे रेल्वे बोर्डने नेरळ रेल्वे स्थानकात उदवाहनची व्यवस्था करण्याची मागणी पूर्ण केली आहे. नेरळ रेल्वे स्थानकातील उदवाहनचे काम पूर्ण झाले असून, आता ती सुविधा कधी कार्यान्वित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हे उदवाहन 10 जूनला सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नेरळ रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाची निर्मिती झाल्यांनतर त्याची उंची पाहून सर्वांची दमछाक होत होती. तब्बल 47 पायर्‍या एका बाजूला असलेल्या त्या पादचारी पुलाबाबत सतत तक्रारी येत होत्या. त्यानंतर स्थानिकांनी उदवाहन आणि सरकते जिने उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार नेरळ स्थानकात उदवाहन उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता नेरळ स्थानकात फलाट दोनवर उभारलेल्या उदवाहनाचे लोकार्पण कधी होणार? याची उत्सुकता प्रवासी वर्गाला होती. लोकार्पण लवकर व्हावे, अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी केली होती.

नेरळच्या काही प्रवाशांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांची भेट घेतली व त्यांना वस्तुस्थिती कथन केली. ओसवाल यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला लेखी स्वरूपात विचारणा केली असता प्रशासनाने नेरळ रेल्वे स्थानकावरील उदवाहनाचे काम प्रगतीपथावर असून एप्रिल 2022 मध्ये सुरू करण्याची शक्यता आहे असे लेखी स्वरूपात कळविले होते. मात्र मे महिना उजाडला तरी उदवाहन सुरू झाले नाही. त्यामुळे ओसवाल यांनी 9 मे रोजी पुन्हा प्रशासनाला विचारणा केली. त्यावर नेरळ येथील उदवाहन तयार आहे. त्याची चाचणी झाल्यानंतर प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यावर 10 जून 2022 रोजी हे उदवाहन सुरू होण्याची शक्यता असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक गौरव झा यांनी लेखी स्वरूपात कळविले आहे.

Exit mobile version