जिल्हाधिकारी किशन जावळेंचे युवकांना आवाहन; अलिबागमध्ये ‘रोजगार महाकुंभा’चा शुभारंभ
| अलिबाग | प्रतिनिधी |
बदलत्या रोजगाराच्या गरजा लक्षात घेता युवकांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता विविध क्षेत्रांतील कौशल्य आत्मसात करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार, दि. 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयात झाला.
सेवा संकल्प अभियानांतर्गत कोकण व नाशिक विभागात एकाच दिवशी 400 हून अधिक ठिकाणी, तर रायगड जिल्ह्यात 12 ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या माध्यमातून युवकांना विविध उद्योग व रोजगारदात्यांशी थेट संवाद साधून उपलब्ध संधींची माहिती घेता आली. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी युवकांनी तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य, संगणकाचे ज्ञान आणि उद्योगाच्या गरजेनुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. कौशल्यामुळे रोजगारक्षमता वाढण्याबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधीही निर्माण होतात, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. ॲड. गौतम पाटील, जे.एस.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य सोनाली पाटील, उपप्राचार्य श्री. गायकवाड, विविध उद्योगांचे प्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व रोजगाराच्या शोधात असलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे यांनी विविध संस्थांच्या स्टॉल्सना भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती घेतली. राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही यावेळी दाखविण्यात आले.







