| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई लोकल ट्रेन ही लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनमधील असुरक्षितता वाढताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच टिटवाळा ट्रेनमध्ये घडली आहे. भरधाव ट्रेनमध्ये अज्ञात व्यक्तीने दारुची बाटली फेकली आणि त्यातील एक अल्पवयीन मुलीला लागली. या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना मंगळवारी (दि.11) रोजी रात्री साधारण 8.30 वाजता सुमारास टिटवाळा लोकल ट्रेनमध्ये घडली आहे. दरम्यान विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये काचेची बाटली फेकली आणि ती बाटली पहिल्यांदा ट्रेन मधील पंख्याला लागली त्यानंतर बाटलीचे तुकडे डब्यात सर्वत्र पसरले असून, त्यातील एक तुकडा अल्पवयीन मुलीला लागला. सध्या लोकल ट्रेनमधील व्हिडिओ एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. मात्र, ट्रेन भरधाव वेगाने असताना ही बाटली नक्की कोणी आणि कुठून फेकली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे महिला डब्यात भीतीचे वातावरण पसरले. महिलांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. मुंबई लोकल ट्रेनमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे शिवाय यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.