उद्या साहित्यसंमेलनाचा समारोप

नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक येथे गेले दोन दिवस संपन्न होत असलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्याचा समारोप आज होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक न्या.नरेंद्र चपळगावकर, बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे.
मराठी साहित्याचा वारसा लाभलेल्या ठिकाणांपैकी नाशिक हे प्रमुख ठिकाण असून, मराठी सारस्वतांचा कुंभमेळ्या असणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्याचे आयोजन दि. 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. संमेलनपूर्वी विविध वाद, नाट्य अशा घडामोडींनी सजलेल्या या संमेलनाची सुरूवात संमेलनाध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर यांच्या अनुपस्थितीत झाली.
परिस्थितीनुसार जरी नियोजित कार्यक्रमपत्रिकेत फेरफार किंवा तडजोड करण्यात आली असली, तरी साहित्यरसिकांच्या सरभराईत हे संमेलन कुठेही कमी पडले नसल्याचे निर्विवाद सांगता येते. या संमेलनाचा आजचा शेवटचा दिवस असून, तो विविध कार्यक्रमांनी सजला आहे.
आज संमेलनात बालकुमार साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये बालसाहित्य समजून घेऊया! (स.9 ते 10), मुलांशी गप्पागोष्टी (साहित्यिक प्रश्‍न) (स.10), बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास (स.10.30), खगोल ते भूगोल (स.11.30), कल्पनांमधील नाविन्यता व विज्ञान (दु.12 ते 1) या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दु.4 ते सायं. 7 या वेळेत संमेलनाचा समारोप सोहळा झाल्यानंतर, जय जय माय मराठी या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे रात्री मराठीचा जागर करण्यात येणार आहे.
संमेलनातील महत्त्वाची बाब म्हणले विविध विषयांवरील परिसंवादांची मेजवानी. या साहित्य संमेलनाच्या तिसर्‍या दिवशी शेतकर्‍यांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयपणा लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटीची भूमिका (9.30 ते 11), नाशिक जिल्ह्याची निमिर्ती – 151 वर्षातील वाटचाल, विकास आणि संकल्प (11.30 ते 1), ऑनलाईन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक? (11 ते 1), साहित्य निर्मितीची कार्यशाळा ः गरज की थोतांड (1 ते 3) या शिर्षकाखाली परिसंवाद होणार असून, यामध्ये भास्कर चंदनशिव, विलास शिंदे, प्राचार्य डॉ. दिलीन धोंडगे, डॉ. विलास साळुंखे, डॉ. नीलिमा गुंडो, वृषाली देशपांडे यांचा सहभाग आहे. 

Exit mobile version