पशुधन दगावल्यास आर्थिक नुकसानापासून संरक्षण; रायगडमधील पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन
| अलिबाग | प्रतिनिधी |
हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, अपघात तसेच लंपी स्किन डिसीज, घटसर्प यांसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे पशुधन दगावल्यास पशुपालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. ही आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ‘पशुधन विमा योजना’ रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दुग्ध व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी केले.
या योजनेची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त रत्नाकर काळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
पशुधन दगावल्यामुळे पशुपालकांवर अचानक आर्थिक संकट कोसळते. अशा वेळी विमा संरक्षणाच्या माध्यमातून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, पशुपालकांचे आर्थिक स्थैर्य टिकून राहावे आणि त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत ॲग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे. योजनेंतर्गत देशी व संकरीत दुधाळ गायी, म्हशी, बैल, रेडे, शेळी आणि मेंढ्या यापैकी जास्तीत जास्त 10 पशुधनाचा विमा काढता येणार आहे. दुभती गाय किंवा बैलासाठी कमाल 70 हजार रुपये, तर दुभती म्हैस किंवा रेड्यासाठी 80 हजार रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. शेळी आणि मेंढीसाठी प्रत्येकी 7 हजार रुपये कमाल विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
पशुपालकांना एक, दोन किंवा तीन वर्षांच्या कालावधीसाठी विमा काढता येणार आहे. विम्याच्या हप्त्यात लाभार्थ्याचा हिस्सा केवळ 15 टक्के राहणार असून, उर्वरित 85 टक्के हिस्सा केंद्र व राज्य शासनाकडून भरला जाणार आहे. त्यामुळे अल्प खर्चात पशुपालकांना आपल्या पशुधनाला विमा संरक्षण देता येणार आहे.
पशुधनाच्या मृत्यूमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असून, रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक पशुपालकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन वैकुंठ पाटील यांनी केले. योजनेबाबत अधिक माहितीसाठी पशुपालकांनी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, ग्रामसेवक किंवा गो-मित्र यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले. पत्रकार परिषदेच्या प्रारंभी सभापती वैकुंठ पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचे स्वागत करण्यात आले.
विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखपत्र : मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, वाहनचालक परवाना किंवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची स्वयंप्रमाणित प्रत.
पशुधनाचे छायाचित्र : पशुधनाचा सर्व बाजूंनी उभा असलेला फोटो आवश्यक असून, त्यावरील टॅग क्रमांक स्पष्ट दिसणे बंधनकारक आहे. पशुपालकासोबत पशुधनाचा उभा फोटोही आवश्यक असून, त्यामध्ये कानातील बिल्ला (इअर टॅग) स्पष्ट दिसला पाहिजे. विमाकर्त्याकडून यूआयडी प्रणालीव्यतिरिक्त आरएफआयडीचाही वापर केला जाऊ शकतो.
पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र : महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद किंवा भारतीय पशुवैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत शासकीय अथवा खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकाने प्रमाणित केलेले पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र आवश्यक.
