। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे गुरुवारी (दि.18) पहाटे गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत 17 म्हशी, 1 गाय आणि 7 वासरे अशा एकूण 25 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन म्हशींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तसेच, गोठ्याचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
रजवेल मोहल्ला येथे पहाटे सुमारे 5.10 वाजण्याच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोठ्यातील जनावरे आत अडकून पडली. घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अग्निशमन पथकाच्या अथक प्रयत्ननानंतर आग नियंत्रणात आली. मात्र, तोपर्यंत 25 जनावरांचा मृत्यू झाला होता. यात 17 म्हशी, 1 गाय आणि 7 वासरांच्या समावेश आहे. दोन म्हशींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र या दुर्घटनेमुळे पशुपालकाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे रजवेल परिसरात शोककळा पसरली असून पशुपालक कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
भीषण आग! गोठ्यातील 25 जनावरांचा होरपळून मृत्यू

fire isolated over black background