पगारवाढीबाबत व्यवस्थापनाकडून दुजाभाव
| कोर्लई | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दिघी पोर्ट या बंदराचा एनसीएलटीकडून 15 फेब्रुवारी 2021 रोजी अदानी समूहाने ताबा घेतला. तेव्हापासून प्रत्येक वेळेला कामगारांच्या बाबतीत दुजाभावाची भूमिका व्यवस्थापन घेत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. याविरोधात स्थानिक कामगारांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
नुकत्याच पार पडलेल्या चालू आर्थिक वर्षांमध्ये 400 एमएमटी (मिलियन मॅट्रिक टन) टार्गेट संपादन केल्यानंतर अदानी समूहामध्ये काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तसेच इतर ठिकाणी काम करणार्या कामगारांना दोन बेसिक पगार देऊन गौरविण्यात आले. परंतु, दिघी पोर्टमधील 2009 पासून काम करणारे श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड तालुक्यामधील सर्वच स्थानिक कामगारांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये व्यवस्थापनाविरोधात असंतोषाचे वातावरण आहे.
दरम्यान, अदानी समूहाच्या दिघी पोर्टमध्ये कंत्राटी म्हणून काम करणार्या एक महिना अगोदर रुजू झालेल्या कामगारालासुद्धा या दोन बेसिक सन्मान देऊन गौरवण्यात आले. याबाबतीत खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली युनियनचे नेते संजय वढावकर, जनरल मजदूर सभा युनियनच्या माध्यमातून अदानी मॅनेजमेंट, युनियन आणि युनियनच्या कमिटी मेंबर्स यांच्यामध्ये वारंवार बैठका घेऊनसुद्धा हा विषय अद्यापपर्यंत मार्गी लागलेला नाही. खा. तटकरे कामगारांचा प्रश्न सोडवू न शकल्याने कामगारांकडून संताप व्यक्त होत आहे.
या सर्व बाबीचा निषेध म्हणून सर्व कामगारांनी खिशाला काळी फीत लावून जाहीर निषेध नोंदविला. व्यवस्थापनाच्या या मुजोर भूमिकेबद्दल दिघी पोर्टमधील कामगारांनी नाराजीचा सूर आळवला असून, येत्या काहीच दिवसात आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.