हजारो लीटर पाणी वाया
| नागोठणे | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला नागोठणे परिसरात काहीसा वेग झाला आहे. मात्र, हे काम करताना ठेकेदार असलेल्या कल्याण टोल प्लाझा कंपनीच्या कर्मचार्यांकडून हलगर्जीपणा सुरू असल्याचे वारंवार दिसून येत आहे. अशातच शनिवारी (दि.5) सकाळी दहा वाजता डोलवी (ता. पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. नागोठण्याजवळील हॉटेल कामतजवळ जेसीबी यंत्राने नुकसान केल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले.
जेएसडब्ल्यू कंपनीला त्यांच्या उत्पादन प्रक्रियेसाठी नागोठण्यातील केटी बंधार्यातून कंपनीच्या पंप हाऊसमधून 1100 एम.एम. व्यासाच्या जलवाहिनीद्वारे उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या जलवाहिनीला काही ठिकाणी व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. असाच एक व्हॉल्व्ह नागोठण्याजवळील हॉटेल कामतजवळून गेलेल्या व सर्व्हिस रोडलगत असलेल्या जलवाहिनीला बसविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी याच सर्व्हिस रोडलगत महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीच्या यंत्राद्वारे गटार खोदण्याचे काम सुरू असताना जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला धक्का लागून तो तुटला. त्यामुळे खूप उंचावर पाण्याचे फवारे उडण्यास सुरुवात झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही जागरूक नागरिकांनी याबाबत कंपनीच्या अधिकार्यांना कळविले. त्यानंतर कंपनीच्या पंप हाऊसमधील पंप बंद करण्यात आले. त्यानंतर कंपनीची तांत्रिक टीम घटनास्थळी पोहोचली व त्यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून ते लगतच्या शेतकर्यांच्या शेतात गेल्याने त्यांचे नुकसान झाले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे व व्हॉल्व्ह बदलण्याचे हे काम दुपारी सुमारे तीन वाजवण्याच्या सुमारास पूर्ण झाले. त्यानंतर जलवाहिनीचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी जेएसडब्ल्यचे अधिकारी चंद्रशेखर करंजकर, जितेंद्र खरसांबळे व रवी पाटील यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान सर्व्हिस रोडलगतच्या गटाराच्या कामात खोदकाम करीत असलेला ठेकेदार, जेसीबी ऑपरेटर जलवाहिनी फुटल्यानंतर जेसीबी यंत्रासह पळून निघून गेले. दरम्यान, कल्याण टोल प्लाझाचा एकही कर्मचारी व संबंधित जबाबदार अधिकारी घटनास्थळी न आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणच्या जवळूनच उच्च दाबाची विद्युत वहिनी गेलेली असल्याने जर पाण्याचा उंच गेलेला फवारा वीज वाहिनीवर उडाला असता, तर अनर्थ घडला असता, असेही बोलले जात आहे.