शाडू माती, कलरच्या वाढत्या किंमतींचाही परिणाम
। म्हसळा । वार्ताहर ।
गणेशोत्सवाला अवघा महिना बाकी असल्याने गणपती कारखान्यांमध्ये अखेरचा हात फिरवला जात असून, मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच महिने आधीच मूर्तिकारांचे काम सुरू होते. मात्र, सध्या शहराबाहेरून बाजारात तयार मूर्ती विक्रीसाठी येत असल्याने स्थानिक मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत. त्यामुळे स्थानिक मूर्तिकारांचा व्यवसाय अडचणीत आल्याचे कारखानदारांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.
पूर्वी म्हसळ्यात जवळजवळ 10 गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने होते. त्यातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असे. यामाध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होत होता; परंतु गेल्या काही वर्षांपासून तयार मूर्ती उपलब्ध होत असल्याने परंपरागत व्यावसायिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या म्हसळा शहरामध्ये परंपरागत गणेशमूर्ती तयार करणारे तीन कारखानदार आहेत. परंतु, पेण आणि अन्य ठिकाणांहून तयार मूर्ती आणून विकणारे अनेक व्यावसायिक आहेत. मात्र, पूर्वापार मूर्ती घडविणाऱ्यांमध्ये नंदकुमार कळस, विशाल साईकर आणी सुदाम कुडतुडकर यांचा समावेश असून, ते स्वतः शाडूच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करून विकतात. विशाल सायकर हा एक तरुण व्यावसायिक असून, त्याने आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. व्यवसायात एक चांगली पकड निर्माण केली आहे. त्याने सांगितले की, दिवसेंदिवस कच्च्या मालाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होत असून, शाडू माती, प्लास्टर, रंग यांचे दर गगनाला भिडत आहेत. शासन मात्र या व्यवसायातील कारखानदारांना कसलीही मदत करीत नसून, केवळ नाईलाजास्तव आम्हाला दरवर्षी थोडीफार वाढ करणे अनिवार्य ठरत आहे. शासनाने शाडू माती आणि रंग याच्या किंमती कमी करून आम्हा कारखानदारांना व्यवसाय करण्यास संधी द्यावी, असेही विशाल साईकर याने कृषीवलशी बोलताना सांगितले.
शहरात आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मूर्तीकार शिल्लक आहेत. आपला व्यवसाय टिकविण्यासाठी जिद्दीने अपार मेहनत घेत पुढे जात आहेत. परंतु, पेण व अन्य ठिकाणाहून येणाऱ्या तयार मूर्तींच्या विक्री केंद्रांमुळे आम्हा स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. शासनाने या व्यवसायातील अडचणी समजून घेत आम्हाला करावी.
विशाल साईकर, स्थानिक मूर्तीकार