माथेरान पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थी
| नेरळ | वार्ताहर |
माथेरान दस्तुरी नाका वाहनतळ येथील पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना आता येथील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे विकेंडला होत असलेल्या पर्यटकांच्या वाहनांच्या गर्दीमुळे स्थानिक टॅक्सी चालक मालक संघटनेना आक्रमक झाली. दरम्यान, टॅक्सी संघटनेने शनिवारी वाहन बंद आंदोलन पुकारले होते. यामुळे पुन्हा एकदा माथेरान घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर वनविभागाशी बोलणे करून, नेरळ माथेरान पोलिसांनी मध्यस्थी करून हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असणार्या माथेरान येथे विकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ वाढत चालली आहे. दरम्यान, खासगी वाहनाने येणार्या पर्यटकांना वाहन पार्किंगच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अपुरी पार्किंग व्यवस्था त्यातच येथील प्रशासनाचे फसलेले नियोजन यामुळे येथील स्थानिक टॅक्सी चालक तसेच पर्यटकांनादेखील वाहनकोंडीचा सामना करावा लागतो. माथेरान दस्तुरी नाका येथील वनविभागाच्या पार्किंग व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजणामुळे प्रत्येक विकेंडला पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शनिवारीदेखील वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागला. तर याचा सर्वात जास्त त्रास स्थानिक टॅक्सी चालकांना झाला. परिणामी, पुन्हा एकदा घाटात 2 किमी च्या वाहनांच्या रांगा दिसून आल्या होत्या. सतत होत असलेली वाहन कोंडी यामुळे अखेर आज नेरळ माथेरान नेरळ स्थानिक टॅक्सी चालक मालक संघटनेने वाहन बंद करत ठिय्या आंदोलन माथेरान दस्तुरी या मुख्य नाक्यावरच सुरू केले होते. सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत असा 1 तास बंद पाळून स्थानिक पार्किंग व्यवस्थापन प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी दस्तुरी नाक्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी तर दुसरीकडे वाहनांची रांग दिसून आली. सदर आंदोलनादरम्यान माथेरान येथील पोलीस रामदासी बापू आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस नरेश नांदगावकर यांनी मध्यस्थी करून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी बोलून पार्किंग व्यवस्थापनेला नियोजन सुधारण्याच्या सूचना केल्या आहेत, तर येणार्या विकेंडला वाहनांची गर्दी होणार नाही म्हणून पूर्वनियोजन केले जाईल, असे आश्वासित केले. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर स्थानिक टॅक्सी संघटनेने आंदोलन मागे घेत पुन्हा वाहतूक सुरु केली आहे. एकूणच, माथेरान या जागतिक पर्यटनस्थळ असणार्या वाहनतळ येथील पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असून, याचा फटका पर्यटनावर होत आहे, त्यामुळे प्रशासनाने या वाहन पार्किंगचा प्रश्न सोडवणे ही काळाची गरज बनली.
