लोकनेते ॲड. दत्ता पाटील यांची जयंती साजरी

| रोहा | वार्ताहर |

कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष, निष्णात वकील, उत्कृष्ट वक्ते, शेकापचे नेते, वंचित बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खेडोपाडी शाळारूपी ज्ञानाची गंगा पोहचविणारे, विधान परिषदेचे नामवंत विरोधी पक्षनेते, हजारो शिक्षकांचे पोशिंदे, दीनदलितांचे कैवारी, स्वर्गीय लोकनेते ॲड. दत्ता पाटील उर्फ दादा यांची जयंती सोमवार (दि.4) रोजी रोह्यातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहेंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

यावेळी चेअरमन संदीप गांगल यांच्या मार्गदर्शनाखाली कोएसो मेहेंदळे हायस्कूल चे मुख्याध्यापक रमेश मोसे यांनी लोकनेते स्वर्गीय दत्ता पाटील उर्फ दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यांच्यासोबत ज्येष्ठ शिक्षक के. आर. पाटील, नारायण पानसरे, डी. एम. पवार, भिवा कोकरे, शिक्षक प्रतिनिधी चेतन भोई, शिक्षिका सुप्रिया मेहत्तर, रिमा पाटील, मनीषा निमन, दर्शना म्हात्रे व इतर शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान ज्येष्ठ शिक्षक नारायण पानसरे यांनी स्वर्गीय दत्ता पाटील उर्फ दादा यांच्या कार्यावर आधारित उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती देताना सांगितले की स्वर्गीय दत्ता पाटील यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेली अफाट मेहनत त्याचबरोबर समाजातील तळागाळातील अन्यायग्रस्त गोरगरीब जनतेला कोणत्याही प्रकारची फी न घेता फुकट वकिली करुन समाजातील गोरगरीब व अन्यायग्रस्थाना न्याय मिळवून दिला व त्यामुळे त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात फुकट्या वकील अशी देखील ओळख निर्माण झाली होती. तसेच ते एक झुंजार वक्ते होते. त्याच बरोबर निर्भीड विरोधी पक्षनेते, शिक्षणप्रेमी होते. विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ प्रतीचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांसोबत प्रत्यक्ष सवांद साधून ते मार्गदर्शन करत असत. तसेच आपल्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन करत असत असेही त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वर्गीय दत्ता पाटील यांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक होऊन अभिवादन केले.

Exit mobile version