11 प्राध्यापकांचा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या यादीत मानाचा ठसा
| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेने संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स 2026’ने जाहीर केलेल्या जागतिक शास्त्रज्ञांच्या मानांकन यादीत विद्यापीठातील तब्बल 11 प्राध्यापकांची निवड झाली असून, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
ए.डी. सायंटिफिक इंडेक्स ही संस्था शास्त्रज्ञांच्या संशोधन कार्य, शोधनिबंधांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील दखल, संशोधनाचा प्रभाव आणि वैज्ञानिक उत्पादकता या निकषांच्या आधारे जागतिक क्रमवारी जाहीर करते. या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणे म्हणजे संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची जागतिक स्तरावर झालेली दखल मानली जाते.
या मानांकनात स्थान मिळवणाऱ्या प्राध्यापकांमध्ये डॉ. एस.एन. नलबलवार, डॉ. एस.एम. जाधव, डॉ. आर.एस. पावडे, डॉ. एन. अग्रवाल, डॉ. ब्रिजेश अय्यर, डॉ. व्ही.जी. सरगडे, डॉ. वाय.एस. महाजन, डॉ. बी.एफ. जोगी, डॉ. ए.बी. नांदगावकर, डॉ. ए.डब्ल्यू. किवळेकर आणि डॉ. व्ही.जे. कदम यांचा समावेश आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या संशोधन कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यापीठातून एकाचवेळी 11 प्राध्यापकांची जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत निवड होणे, ही अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. या यशामुळे लोणेरे विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना मिळणारे जागतिक दर्जाचे मार्गदर्शन अधोरेखित झाले आहे. संशोधन आणि नवतंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने घेतलेली ही भरारी केवळ विद्यापीठासाठीच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमीला आता शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातही जागतिक ओळख मिळत आहे. लोणेरे विद्यापीठातील 11 प्राध्यापकांची जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत निवड होणे, ही रायगड जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब मानली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे संशोधन आणि मार्गदर्शन मिळू शकते, हे या यशातून सिद्ध झाले आहे. शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रायगड जिल्हा आता नवी ओळख निर्माण करत असल्याचे या यशामुळे अधोरेखित झाले आहे.
