सामान्य नागरिकांना दिलासा
| तळा | वार्ताहर |
तळा बसस्थानकातून एसटी वाहतूक काही प्रमाणात सुरू झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बसस्थानकातून सध्या तळेगाव-मुंबई व तळा-बोरिवली या लांब पल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी कर्मचार्यांनी राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी संप पुकारला होता. यामुळे राज्यातील बससेवा ठप्प झाली होती. प्रशासनाकडून एसटी कर्मचार्यांच्या काही मागण्या मान्य करून हा संप लवकरच मिटवला जाईल, असा अंदाज नागरिकांकडून लावला जात होता; परंतु तोडगा न निघाल्याने तसेच दिवसेंदिवस एसटी संप चिघळला गेल्यामुळे सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम झाला होता. एसटी बंद असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा अवलंब करावा लागत होता. परंतु, एसटीपेक्षा खासगी वाहनांचा दर दुप्पट असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत होते. अशातच रविवारी तळा बसस्थानकात दुपारी एसटीचे आगमन झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांचादेखील प्रवास सुखकर होणार आहे.
तळा येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू
