कर्जतमध्ये गॅसटंचाई

लांब रांगांमुळे ग्राहक त्रस्त

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत शहरात इंडियन गॅस आणि एचपी गॅस अंतर्गत घरगुती गॅस सिलिंडरचे वाटप सुरू असले तरी गॅस टंचाईमुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरासह परिसरातील गावांमध्ये गॅससाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. कर्जत परिसरातील इंडियन गॅस आणि एचपी गॅस एजन्सीकडून गॅस वाटप सुरू असले, तरी दोन वाहनांमधून होणाऱ्या वितरणामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहे. परिणामी एजन्सी केंद्राबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होत असून, रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

गॅस बुकिंग, ओटीपी नोंदणी, केवायसी प्रक्रियेमुळे ग्राहकांना अधिक त्रास सहन करावा लागत असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहाता तालुक्यात या दोनच एजन्सीमार्फत गॅस पुरवठा होत असल्याने टंचाई अधिक तीव्र जाणवत आहे. या परिस्थितीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार होण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काही ग्रामस्थांनी वेळेवर गॅस मिळत नसल्याची तक्रार केली आहे. पूर्वी 21 दिवसांत बुकिंगची सुविधा उपलब्ध होती. मात्र, आता वितरणानंतर तब्बल 25 दिवसांनीच बुकिंग करता येत असल्याने ग्राहकांना अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version