। अलिबाग । प्रतिनिधी ।
रेल्वेतून प्रवास करणार्या महिलेच्या बॅगमधील हजारो रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. चालत्या रेल्वेतून ही लूट शनिवारी (दि.15) मध्यरात्रीच्या सुमारास इंदापूर ते रोहा दरम्यान घडली.
केरळ राज्यातील प्रवासी महिला एर्नाकुलम सुपर फास्ट एक्स्प्रेस कन्नुर या रेल्वेतून कन्नूर ते पुणे असा प्रवास करीत होती. दि.15 रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास इंदापूर ते रोहा या स्थानकादरम्यान रेल्वेचा वेग मंदावला. या संधीचा फायदा घेत चोरट्याने महिलेच्या हातातील बॅगमधील 81 हजार 850 रुपयांचा ऐवज लंपास करून चालत्या गाडीतून उडी मारून पळ काढला. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला सहाय्यक फौजदार सीमा सावंत अधिक तपास करीत आहेत.