गॅस तपासणीच्या नावाखाली लूट

| चिरनेर | प्रतिनिधी |

बीपीसीएल घरगुती गॅस धारक ग्राहकांच्या गॅस जोडणीची सुरक्षा मोहीम सुरू आहे. त्यासाठी बीपीसीएल गॅस वितरक व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पत्राआधारे वितरकाकडून जी सरसकट लूट सुरू आहे, ती तात्काळ थांबवावी. वितरकाने तपासणी शुल्क माफ करावे तसेच ग्राहकांना आधी घरपोच सिलेंडर सेवेचे पालन करावे अशी मागणी चिरनेर गणातील उरण पंचायत समितीच्या सदस्या कविता पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच, ग्राहकांनी तपासणी शुल्क न भरण्याचे आवाहनही बीपीसीएल गॅसधारकांना केले आहे. बीपीसीएल घरगुती गॅस वितरकाकडून गॅस जोडणी सुरक्षा तपासणीची सरसकट 236 रुपये शुल्क आकारले जात असून, रबरी नळी व अन्य उपकरणांसाठीही अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचे काही ग्राहकांनी पंचायत समिती सदस्य कविता पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

याबाबत उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना संपर्क केला असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे उत्तर देत पुरवठा अधिकाऱ्यांशी बोलून घेतो असे सांगितले. भारत पेट्रोलियमचे विक्री अधिकारी राहुलकुमार कन्नोजिया यांना संपर्क करून हे शुल्क ग्राहकांना माफ करावे असे सांगितले. त्यांनी सुरक्षतेची ही तपासणी दर पाच वर्षात एकदा होते जी अनिर्वाय आहे. शुल्क माफी करण्याबद्दलची आपली विनंती पेट्रोलियम मंत्रालयाला निश्चित कळवू असे सांगितले. तर ॲड. पर्जन्य म्हात्रे, कोप्रोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नीरज पाटील, विपुल म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे यांनी तपासणी पथकाला विरोध दर्शविला शुल्क भरू नये असे आवाहन केले आहे.

Exit mobile version