। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरामध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील जैन मंदिरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भगवान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. जैन परंपरेत असे मानले जाते की 6 व्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहार, भारत मधील कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ व राणी त्रिशलामाता यांचेपोटी क्षत्रिय कुटुंबात झाला होता. त्यांनी 30 वर्षे भारतभर फिरून जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार केला.
यावेळी भगवान महावीरांची प्रतिमा सुवर्ण रथात विराजमान करण्यात येऊन भव्य मिरवणूक संपूर्ण अलिबाग शहरात फिरवण्यात आली. यावेळी जैन समाजाच्या महिला व पुरुष व तरुण वर्ग मोठ्या संख्येने शामिल झाला होता. ढोल ताश्यांच्या गजरात मोठ्या उत्सहात मिरवणुकीत लोक शामिल झाले होते.यावेळी अलिबाग शहरातील भगवान महावीर मंदिरात अभिषेक कार्यक्रम,पूजा व भक्ती संध्या आरती असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते.सदरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अनिल चोपडा, मुकेश जैन, आकाश जैन, राजेंद्र प्यारेलाल, भरत जैन, वसंत जैन, सम्राट जैन, भावेश् जैन यांच्यासह मोठ्या संखेने जैन समाज सहभागी झाला होता.
कच्छी युवक संघाच्या महारक्तदान शिबीरात 115 जणांचे रक्तदान
भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबीरात 115 दात्यांनी रक्तदान केले. या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. कच्छ युवक संघ अलिबाग शाखा, कच्छी भवन ट्रस्ट अलिबाग आणि लायन्स क्लब अलिबाग तर्फे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी या शिबीरास भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ दिपक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर यशस्वी झाले.