। कोलाड । वार्ताहर ।
हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात तीन ते चार दिवस जोरदार पाऊस पडला. कोलाड-खांब परिसरात मंगळवार दि.6 मेपासून तीन दिवस सतत विजेच्या कडकडासहित वादळवार्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे भातपिकासहित आंबा बागायतीदार तसेच विटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
कोलाड-खांब परिसरात काही ठिकाणी उन्हाळी भातशेती केली जाते. ही भात शेती अंतिम टप्प्यात आली असून, येथील काही शेतकर्यांनी भातशेतीची कापणी करून ठेवली आहे. परंतु, कापून ठेवलेल्या भातशेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, अंब्याची फळे गळून पडल्यामुळे आंबा बगायतीदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर विटभट्टी व्यावसायिकांचे देखील वीटभट्टी रचण्याचे काम अंतिम टप्यात आले होते. परंतु, या पावसामुळे विट्टभट्टीत पाणी गेल्याने त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.