। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यात लागलेल्या वणव्यामुळे गोवे येथील बागायतदार शेतकर्यांचे आंबा व काजुंची कलमे जळून खाक झाली आहेत. या वणव्याच्या भडक्यामुळे येथील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडांशी आलेला घास क्षणात हिरावून नेला आहे.
गोवे येथे बुधवारी (दि.5) दुपारच्या सुमारास अचानक वणवा पेटला आणि काही क्षणात वणव्याने रौद्ररूप धारण केले. बघता बघता बागेत हा वणवा पसरला आणि या वणव्यात आंबा, काजु, चिकु, फणसांची झाडे भस्मसात झाली आहेत. त्यामुळे येथील शेताकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात गोवे येथील शेतकरी नंदा वाफिळकर आणि निलेश वाफिळकर यांची एकूण 25 ते 30 झाडे जळून खाक झाली आहे. संबंधित अधिकार्यांनी बागेची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात येत आहे.